......तर ते आज आमच्यात असते !

Foto

औरंगाबाद: शहरात गेल्या काही दिवसात झालेल्या अपघातात वेळेवर मदत न मिळाल्याने दोन युवकांना आपले प्राण गमवावे लागले. विशेष म्हणजे हे युवक अपघातग्रस्त असताना मोठ्या प्रमाणावर जमलेले लोक बघ्याची भूमिका घेत होते  व फोटो आणि छायाचित्रीकरण करत होते. त्यांना वेळेवर मदत मिळाली असती तर ते आज आमच्यात असते. अशा शब्दात हेल्प रायडर्स च्या वतीने रविवारी आयोजित श्रद्धांजलीपर जनजागृती कार्यक्रमात अपघातामध्ये मृत झालेल्या युवकांच्या  नातेवाईकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

क्रांती चौक परिसरातील झाशीची राणी उद्यानात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार संजय शिरसाट, अतुल सावे, सेवानिवृत्त सहायक पोलिस आयुक्त नरेश मेघराजनी, पृथ्वीराज पवार, शिरीष बोराळकर, दिलीप थोरात, आनंद तांदुळवाडीकर, नगरसेविका कीर्ती शिंदे हेल्प रायडरचे संदीप कुलकर्णी आदींची उपस्थिती होती.

गेल्या काही दिवसात शहरात झालेल्या दोन विविध अपघातांमध्ये वेळेवर मदत न मिळाल्याने डॉ. अतुल देशमुख व सुमित कवडे यांना आपला जीव गमवावा लागला होता. यानंतर हेल्प रायडर्स ग्रुपच्यावतीने चला जपुया माणुसकी, अपघातग्रस्तांना मदत करा या संकल्पनेअंतर्गत रविवारी सायंकाळी श्रद्धांजलीपर जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रास्ताविक करताना संदीप कुलकर्णी यांनी एक वर्षापूर्वी संघटनेची स्थापना केली असून, आज वर १४५ जणांना मदत केली आहे. यात १४ लोकांचे जीव वाचवण्यात यश आल्याचेही ते म्हणाले. नुकतेच अपघातात मृत्यू झालेल्या कवडे यांचे नातेवाईक राकेश कवडे व देशमुख यांचे नातलग स्वप्नील देशमुख यांनी आपल्या भावना व्यक्त करून वेळेवर मदत मिळाली असती तर कदाचित हा प्रसंग आला नसता. अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त करीत अपघात ग्रस्तांना दवाखान्यात पर्यंत पोहोचवा त्यांची मदत करा असे आवाहन केले. संघटनेच्या वतीने मदत करण्यात आलेल्या काही अपघात ग्रस्तांना ह्या वेळी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.

मेघराजनी व आमदार शिरसाट यांनी सांगितल्या आपल्या अपघाताच्या आठवणी
यावेळी बोलताना आमदार शिरसाट यांनी ते मनपा मध्ये सभागृहनेता असताना झालेल्या अपघाताच्या आठवणी यावेळी सांगितल्या. त्या वेळी योग्य व वेळेवर मदत मिळाल्याने आज मी येथे आपल्यासमोर उभा असल्याचे ते म्हणाले. तर मेघराजनी यांनी दौलताबाद परिसरात आपलाही अपघात झाला होता. असे सांगत हेल्मेट परिधान केलेले असल्याने डोक्याला इजा झाली नाही. त्यामुळे सुखरूप राहिल्याचे सांगितले. यामुळेच सर्वांनी नियम पाळण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.